विरोधकांची आता खैर नाही; राज्यभरातील ३ कोटी घरापर्यंत भाजपा पोहचणार!

कामठी – भाजपाच्या घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील भाजपाचे सर्व नेते व कार्यकर्ते ३ कोटी घरापर्यंत पोहचणार असून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती ते सर्वांना देणार आहेत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी दिले.

ते कामठी विधानसभा क्षेत्रात आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह घर चलो अभियानात सहभागी झाले. कामठी विधानसभा क्षेत्रातील नागपूर ग्रामीण, कामठी व मौदा तालुक्यातील १५ गावांतील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, २०१४ नंतर पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या सरकारने मागील ९ वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून समर्थन मिळविण्यासाठी घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ता यात सामील होणार आहेत. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली कामे पूर्ण झाल्याची माहिती जनतेपर्यंत पोहचून आम्ही देत आहोत. मतदारांकडून आम्ही मताचे कर्ज घेतले होते, ते विकासाच्या माध्यमातून परत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६० हजार तर लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख व महाराष्ट्रातील ३ कोटी घरांपर्यंत पोहचण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मतदारांपर्यंत पोहचून ९०९०९०२०२४ या क्रमांकावर कॉल करून मोदीजींसाठी समर्थन मागणार आहोत, असेही ते म्हणाले.

 दिवसभरात पंधरा गावांना भेटी
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील डोंगरगाव येथून घर चलो अभियानाला सुरुवात केली. दिवसभराच्या दौऱ्यात त्यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरी, खापरी पुनर्वसन, बेलतरोडी, बेसा, पिपळा, हुडकेश्वर, नरसाळा, गोन्हीसीम, बहादुरा, खरबी, कामठी तालुक्यातील बिडगाव, भूगाव, वडोदा व मौदा (Khapri, Khapri Rehabilitation, Beltarodi, Besa, Pipla, Hudkeshwar, Narsala, Gonhisim, Bahadura, Kharbi, Bidgaon, Bhugaon, Vadoda and Mauda) येथे भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अनिल निधान, अजय बोढारे, सुनील कोढे, नरेश मोटघरे, रमेश चिकटे, डी.डी सोनटक्के, भगवान मेंढे, पूजा धांडे, आदर्श पटले, प्रिती मानमोडे, विद्या मडावी, किशोर बेले, हरीष जैन यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांत उत्साह, जागोजागी स्वागत
भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्षबावनकुळे यांचे भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. विशेषत: महिला व लहान मुलांमध्ये या अभियानाचा विशेष उत्साह दिसून आला. बावनकुळे यांनी घरोघरी पोहचत मोदी सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहितीचे पत्रक दिले व मतदारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. घर चलो अभियानात सहभागी होणाऱ्या कार्यकर्ते व भाजपा समर्थकांचे त्यांनी आभार व्यक्त केला.