ब्लॉकचेन तंत्रज्ञान, क्रिप्टोकरन्सीने देशात क्रांती घडेल; गौरव सोमवंशी यांचे मत 

पुणे : काही वर्षांपूर्वी इंटरनेटबाबत जसा आपण विचार करत होतो, तसाच काहीसा विचार आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल करतो आहोत. परंतु, ब्लॉकचेन हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर तत्वज्ञानही आहे. याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले, तर ब्लॉकचेन तंत्रज्ञान व क्रिप्टोकरन्सीमुळे (Blockchain Technology and Cryptocurrency) देशात क्रांती घडेल, असे मत इमरटेक इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक गौरव सोमवंशी यांनी व्यक्त केले.(Blockchain technology, cryptocurrency will revolutionize the country; Gaurav Somvanshi’s opinion)

पुण्यातील सिफी फायनान्स संस्थेतर्फे विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान व क्रिप्टोकरन्सी’ या विषयावर मार्गदर्शन करताना गौरव सोमवंशी बोलत होते. गौरव सोमवंशी यांनी ब्लॉकचैन तंत्रज्ञान, क्रिप्टोकरन्सी, मेटावर्स आणि एनएफटी यामधील नाविन्यपूर्ण, सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा घेतला. उच्च न्यायालयातील वकील बिजेंदर शर्मा, ब्लॉकचेन तज्ज्ञ अभिजित नागवडे, सिफी फायनान्सचे नवनाथ आवताडे, विनोद गाडीलकर, गणेश वयचळ, भाऊसाहेब जाधव, अशोक पवार आदी उपस्थित होते. ‘ऑप्टिमस’ या अर्थविषयक ऍपचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

गौरव सोमवंशी म्हणाले,  एखादे चलन बाजारपेठेत चालवायचे ठरवले तर ते आपल्यावर असते. आपण बोललो तर ते चालू शकते. जोपर्यंत आपणहून काही बंद करणार नाही, तोवर ते चलन चालू राहते. त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेनचे भवितव्य हे लोकांवर अवलंबून आहे. ब्लॉकचेनमुळे व्यवहारात, सरकारी स्तरावर पारदर्शकता, विश्वासार्हता आणणे शक्य झाले आहे. हे तंत्रज्ञान वाढतच जाणार असून, भविष्यातील आर्थिक व्यवहार याद्वारे होतील.&

नवनाथ अवताडे म्हणाले, जगभरात ब्लॉकचेन तंत्रज्ञान, क्रिप्टोकरन्सी बाबत जागृती वाढत आहे. राज्यातील सामान्य लोकांनाही याची माहिती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजिला. कमीतकमी जोखमीवर आधारित गुंतवणुकीचे पर्याय लोकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बिजेंदर शर्मा, अभिजित नागवडे यांनीही ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. ऍड. सुरेश सातकर, अल्ताफ पठाण यांनी सूत्रसंचालन केले. आभार पांडुरंग खामकर व संदीप दरेकर यांनी मानले.