उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून उजनी धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणार – नारायण पाटील 

करमाळा/जेऊर : उजनी पाणी परिषदेच्या (Ujani Water Council) माध्यमातून उजनी धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणार असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी दिली आहे. इंदापूर (Indapur) येथील मान्यता मिळालेल्या उपसा सिंचन योजनेवरुन सोलापूर (Solapur)  जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम झाले असून आता माजी आमदार नारायण पाटील यांनीही आपली भुमिका मांडली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी आपल्या घर, शेतजमीन व गावांचा त्याग केल्यानंतर उजनी धरणाची निर्मिती झाली.आज उजनीच्या पाण्यावर पहिला अधिकार हा प्रकल्पग्रस्तांचा असून त्यांच्या भावना वा मत विचारात न घेता आज उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. तसेच आता प्रत्यक्षात उजनीसाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची व्यथा त्याच्या गावात जाऊन आपण जाणून घेणार असून उजनीच्या भविष्यातील सुस्थितीतील अस्तित्वासाठी आपण शेतकऱ्याला (Farmers) या नियोजनात सहभागी करून घेणार आहोत.

विद्यमान आमदारांनी करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांची (dam victims) फसवणूक केली असून याचे गंभीर परिणाम दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून उजनीकाठच्या दहा गावांमध्ये प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत जाणून घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तर उजनी पाणी परिषदेचा हा नियोजित कार्यक्रम दिनांक २६ मे पासून सुरू होत असून दिनांक ६ जून रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.दि २६ मे (वांगी नं ३), दि २७ मे (उमरड), दि २८ मे (कंदर), दि २९ मे (चिखलठाण १), दि ३० मे (शेलगाव-वांगी), ३१ मे (वाशिंबे), १ जून (केतुर २), दि २ जून (टाकळी), दि ३ जून (कोंढारचिंचोली), दि ४ जून (जिंती) अशा ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले असून सधर सभेच्या ठिकाणी आसपासच्या गावातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना (project victims) आमंत्रीत करण्यात येणार आहे.

उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून या सर्व सभा झाल्या नंतर व प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत विचारात घेऊन दि ६ जून रोजी जेऊर (Jeur) येथे पत्रकारांशी संवाद साधून माजी आमदार नारायण पाटील हे धरणग्रस्तांचे वतीने आपली भूमिका एका पत्रकार परिषदेत मांडणार आहेत.तरी या उजनी परिषदेत धरणग्रस्त व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पाटील गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा डाॅ संजय चौधरी व  प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे.