‘आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही, तेवढा या चार दिवसांत मिळाला’

Mumbai – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या सरकारच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका लावला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी अजून मतदारसंघात गेलो नाही, पण जिल्ह्यात आलो आहे. विशेष म्हणजे काही अनेक वर्षांची कामे राहिली होती. ती सर्व मुख्यमंत्र्यांकडे दीड-दोन वर्षांपासून खोळंबली होती, ती सर्व मार्गी लागून आलो. आता मतदार संघात जात आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही, तेवढा या चार दिवसांत मिळाला आहे.

खरं म्हणजे मला कॅबिनेट सुद्धा नाही आणि राज्यमंत्रीपद सुद्धा नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात, किती खाती येतात, त्याप्रमाणे पुढील रुपरेषा आणि दिशा ठरविण्यात येईल. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. माझ्याकडे सध्या खूप मोठे पद आहे, ते म्हणजे एका कार्यकर्त्याचे पद, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.