‘भाजपनं अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा, फडणवीसांना पत्र

मुंबई| महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची (Andheri East Bypoll Election) चर्चा आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून (BJP) या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान या निवडणूकीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख (मनसे) राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी भाजपा नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना एक पत्र लिहिले आहे. भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवू नये अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

आमदार रमेश लटके यांच्या दुर्देवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एखाद्या दिवंगत आमदाराच्या पश्चात त्याच्या घरातील व्यक्ती निवडणूक लढवत असल्यास आपण निवडणूक न लढवण्याचे धोरण स्विकारावे. याने दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली अर्पण होते. असे करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात सांगितले आहे.

मनसेचीही हीच भूमिका राहिली आहे. मनसे खडकवासल्याचे आमदार आणि ‘गोल्ड मॅन’ रमेश वांजळे यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या पत्नींना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडल्यानंतर राज ठाकरेंनी उमेदवारच उतरवला नव्हता. या पोटनिवडणूकीत भाजपाने भिमराव तापकीर यांना उमेदवारी दिली होती, ज्यांनी रमेश वांजळेंच्या पत्नीचा पराभव केला होता.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात ?

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दिवंगत रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. 

 मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.

दरम्यान, आता राज ठाकरे यांनी पत्राद्वारे भाजपला केलेल्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा मिळताना दिसतोय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत देवेंद्र फडणवीस अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपचा उमेदवार उतरवतील की नाही?, हे पाहाणेही औत्सुक्याचे ठरेल.