‘मोदींचे भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण राहील’ 

मुंबई  : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत देशही अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केला असून, त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्यामध्ये  येणाऱ्या काळात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा ‘मित्र’संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे  राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस  राजेश क्षीरसागर यांची महाराष्ट्र राज्याच्या ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्री.नेव्हिल संघवी यांच्या कामाची स्तुती करत नूतन अध्यक्ष श्री.आशिष गांधी यांना पुढील वाटचालीस श्री.राजेश क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.

यानंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण पश्चिम भारतातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे १३०० पेक्षा अधिक सभासद असणारी आणि अमृत महोत्सव वर्ष साजरा  करणारी अग्रगण्य संघटना असून, गेल्या अनेक वर्षा पासून रोजगार निर्मिती, आयात -निर्यात, अत्याधुनिक उत्पादने याद्वारे राज्यासह देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम असोसिएशनने केले आहे. यासह आजच्या गरजा आणि तंत्रज्ञान विचारात घेवून या असोसिएशनने राबविलेले अनेक उपक्रम उल्लेखनीय आहेत. त्याचमुळे ही संघटना जागतिक स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवीत पाय रोवून उभी आहे, हे भावी युवा पिढीसाठी फायदेशीर आहे.

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन प्रमाणेच भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्याअनुषंगाने भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत – इंडिया @४७ च्या संकल्पनेतून जागतिक महासत्ता बनविण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वास्तविक पाहता जेव्हा देशाची अर्थव्यवस्था २ ट्रिलियन वरून ५ ट्रिलियनवर जाते तेव्हा कोणत्याही राष्ट्रातील सर्वोच्च बुल मार्केट होते. आजतागायत फक्त 3 देशच अशी कामगिरी करू शकले आहेत. जागतिक महासत्ता बनण्याच्या प्रवासाकडे भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेची नुकतीच सुरुवात होत आहे.

विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा सन २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थे मध्ये महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात मोठी असून, देशाच्या सकल उत्पन्नामध्ये (GDP) राज्याचा वाटा १५% आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत कार्यरत असलेल्या नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीति आयोगाकडून देण्यात आल्या. त्यानुसार नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून, या संस्थेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपाध्यक्ष पदावर माझी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा देण्याची जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून आमची आहे. याकरिता भारत सरकार, नीति आयोग, मित्र संस्था, विविधी अशासकीय संस्था, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन सारख्या जगभरातील नामांकित संस्थांमध्ये संवाद घडवून आणून विविध उद्योग, प्रकल्पांच्या माध्यमातून स्वकीय आणि परकीय गुंतवणूक राज्यात आणणे आणि राज्याची पर्यायाने देशाची प्रगती करण्याचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रासह कृषी, आरोग्य, बुद्धिमत्ता विकास, शिक्षण, बांधकाम, वित्त, पर्यटन, क्रिडा, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यावरण, वने आणि वन्यजीव संरक्षण आदी क्षेत्रांवरही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी काळात भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी राज्याचा जी.डी.पी वाढविण्याच्या दृष्टीने मित्र संस्थेच्या माध्यमातून विविध संकल्पना राबवून जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवू. यामध्ये बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कौशल्यांची मागणी पुरवठा यांच्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने या उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रात युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे. यासह राज्यातील नवनवीन प्रकल्प आणि धोरणामध्ये बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधीना विचार विनिमय करण्यासाठी समाविष्ट करण्यात यावे, या मागण्यांसदर्भात लवकरच मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा करून बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही क्षीरसागर यांनी दिली.

यावेळी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नेव्हिल संघवी, नूतन अध्यक्ष आशिष गांधी, सेंट्रम ग्रुपचे चेअरमन  जसपाल बिंद्रा, कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे व्हॉइस चेअरमन  श्रीराम दांडेकर, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष  राजेंद्र कोठारी, सचिन शहा,अमित कुमार आदी संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते.