भाजप महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर फक्त स्वत:च्या प्रचारासाठी करतो : कॉंग्रेस

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आज महात्मा गांधीजींची ७४ वी पुण्यतिथी पाळली. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली होती. यावेळी बोलताना काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी म्हटले की भाजप महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर केवळ स्वत:च्या प्रचारासाठी करतो.

यावेळी जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, एआयसीसी मीडिया प्रभारी अलका लांबा, जीपीसीसी उपाध्यक्ष एम के शेख, माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर, सुनील कवठणकर, विठू मोरजकर, हिमांशू तिवरेकर, नौशाद चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

शंभूभाऊ बांदेकर म्हणाले की, गांधीजींनी ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ या तत्त्वांनी जगाची मने जिंकली. एवढा महान नेता भारतात जन्माला आला याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे असे ते म्हणाले. अलका लांबा म्हणाल्या की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही सन्माननीय पदवी दिली, मात्र मोदी सरकार त्यांचा अनादर करते. “भाजप सरकारने दिल्लीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले, मात्र जेव्हा ते महात्मा गांधीजींचा अनादर करतात तेव्हा मला वाटते की हा नेताजींचाही अनादर आहे.” असे त्या म्हणाल्या.

गिरीश चोडणकर म्हणाले की, महात्मा गांधीजींची हत्या झाली तेव्हा जगाला धक्का बसला होता. “हा आपल्या देशातील पहिला दहशतवादी हल्ला होता. आरएसएसच्या द्वेषपूर्ण विचारसरणीने नथुराम गोडसेला दहशतवादी बनण्यास आणि महात्मा गांधींना मारण्यास भाग पाडले.’’ असे ते म्हणाले.बापूजी अजून जिवंत आहेत. आरएसएस त्यांचे विचार आणि तत्त्वे मारू शकले नाहीत. आरएसएस महात्मा गांधीजींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत.’’ असे ते म्हणाले.

दिनेश गुंडू राव म्हणाले की, भारताच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. या शहीद दिनी आम्ही त्या सर्वांचे स्मरण करतो. असे राव म्हणाले. गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध अहिंसक लढा दिला. महात्मा गांधी आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वामुळे आपला देश एकसंध राहिला.’’ असे राव म्हणाले. आज पुन्हा फूट पडत आहे. लोक द्वेष आणि हिंसाचाराची भाषा बोलत आहेत. धर्माचा वेश वापरून काही लोक हिंसाचाराला चिथावणी देत आहेत आणि लोकांना ठार मारण्याच्या घटना घडत आहेत. हे खूप वाईट आहे.” असे ते म्हणाले.

भाजप महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर केवळ स्वत:च्या प्रचारासाठी करते, परंतु त्यांची धोरणे आणि कार्यक्रम त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत. भाजपने त्यांना राष्ट्रपिता आणि नेता म्हणून कधीही स्वीकारले नाही. असे राव यांनी म्हटले. देशाच्या रक्षणासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.