‘जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजीतचा अझरुद्दीन आणि शरदचंद्र हे शमशुद्दीन झाले असते’

मुंबई – “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर टीका केली आहे.जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील. असं मला वाटतं आहे. असं ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रज्जाक झाला असता. परंतु मतांच्या राजकारणासाठी घाणेरडं विधान करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केलं जातय हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील. असं पडळकर यांनी म्हटले आहे.