जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?

Pune – दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या (Mukta Tilak )  रिक्त झालेल्या जागेवर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे.सहाजिकच कसब्यातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी  मिळेल शक्यता होती. मात्र ती उमेदवारी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते हेमंत रासने (Hemant Rasane ) यांना देण्यात आली. गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ म्हणून रासने यांना ही उमेदवारी देण्यात आली.  कसबा मतदार संघातील ब्राह्मण समाज (Brahmin ) हा नेहमीच भाजपच्यामागे उभा राहिला आहे.कसब्यात 13 टक्के मतं ब्राह्मणांची आहे. यामुळेच रासने यांना उमेदवारी मिळताच विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण सुरु केले.

दरम्यान, शैलेश टिळक (Shailesh tilak ) हे सुरुवातीला काहीसे व्यथित झाले मात्र त्यांनी मुक्ता टिळक यांनी ज्याप्रमाणे पक्षादेश मानून  स्वतः निष्ठेने भाजपमध्ये काम केले त्याच प्रमाणे शैलेश टिळक यांनीही रासने यांच्यासाठी झोकून देवून काम सुरु केले आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारचा राग मनात न ठेवता  पक्ष निष्ठेचा आपल्या आईचा वारसा पुढे नेत पक्षाचा आदेश मानून कुणाल टिळक यांनीही पक्षाचे काम सुरु केले आहे. याशिवाय स्वतः रासने यांचे देखील ब्राह्मण समाजाशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत यामुळेच ते अनेक वर्षे या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.

या सर्व गोष्टींचा आता सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसू लागला असून या मतदार संघातील नाराज असणारा ब्राह्मण समाज देखील आता रासने यांच्या पाठीशी उभा राहू लागल्याचे चित्र आहे. यातूनच आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा ब्राम्हण विकास मंचने निर्णय घेतला आहे. यासोबतच पुणे शहर जय गणेश भावनामृत ब्राह्मण महासंघाने देखील रासने यांना पाठींबा दिला आहे. आणखी काही ब्राह्मण समाजातील संघटना देखील पाठींबा देतील असे सांगण्यात येत आहे. यामुळे एकंदरीतच ब्राह्मण समाज हा जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावताना दिसत आहे.आता हा समाज येत्या निवडणुकीत नेमका काय भूमिका घेतो हे लवकरच स्पष्ट होईल.