राखी सावंतच्या पतीच्या अडचणी वाढल्या; इराणी विद्यार्थीनीने आदिलवर केला बलात्काराचा आरोप

मुंबई- राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) सध्या सतत चर्चेत आहे. आदिलवर एंटरटेनमेंट क्वीन राखीने मारहाण आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे आदिल अडचणीत असताना त्याच्या समस्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्याच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये एका विद्यार्थीनीने बलात्काराचा गुन्हा (FIR Against Adil Khan Durrani) दाखल केला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, एका इराणी विद्यार्थ्यीनीने म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलिस स्टेशनमध्ये आदिलविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. राखीच्या पतीविरुद्ध आयपीसी कलम ४१७, ४२०, ३७६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता आदिलच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. आदिलने तिचे इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकीही दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. ही विद्यार्थिनी आणि आदिल खान डेझर्ट लॅब फूड अड्डामध्ये पहिल्यांदा भेटले होते. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. नंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. इराणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, आदिलने तिला लग्नाचं वचन देत मैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या अपार्टमेंटमध्ये दोघंही एकत्र राहत होते.

पाच महिन्यांपूर्वी जेव्हा या विद्यार्थिनीने आदिलला लग्नाची गळ घातली तेव्हा त्याने असं करण्यास नकार दिला आणि त्याने आपले तिच्यासारख्या अनेक तरुणींशी असे संबंध असल्याचं सांगितलं. जेव्हा या तरुणीने त्याला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा त्याने तिच्या मोबाइलवर दोन वेगवेगळ्या नंबरवरून तिचे काही इंटिमेट फोटो पाठवले.

आपल्या तक्रारीत संबंधित तरुणीने त्या मोबाईल नंबर्सचाही उल्लेख केला आहे. याशिवाय आदिलने यावरून तिला धमकी दिली की, पोलिसांकडे गेल्यास तो तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल तसेच तिच्या पालकांनाही हे फोटो पाठवेल. एवढंच नाही तर कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास आदिलने त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती असं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.