राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह यांच पुण्यात आगमन, मनसे अध्यक्षांबद्दल म्हणाले…

पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) या कुस्ती स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. आज कोथरुड येथे महाराष्ट्र केसरीचे उपांत्य सामने, अंतिम सामना व पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. या खास दिनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. कधीकाळी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्र केसरीच्या शेवटच्या दिवशी पुण्यात आले असून विमानतळावर त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं.

ब्रिजभूषण सिंह हे कोथरुड येथे आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले आहेत. (Brijbhushan Singh on Raj Thackeray) तसेच राज ठाकरे आल्यास आपण नक्कीच त्यांची भेट घेऊ असे वक्तव्यही यावेळी ब्रिजभूषण यांनी केले.

ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला होता. मात्र राज ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्रात येण्यावर विरोध केला नाही. यावर देखील ब्रिजभूषण यांनी भूमिका स्पष्ट केली.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “कधीकाळी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना देखील माहित नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, दिवसे गेले.”