कसब्यातील उमेदवार भाजप बदलण्याच्या तयारीत ? जाणून घ्या बावनकुळे यांनी नेमके काय दिले आहेत संकेत

Pune Bypoll Election: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, कसबा मतदार संघातून भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्याने तसेच स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमेदवार न दिल्याने मोठी नाराजी आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिळकांच्या घरात उमेदवारी देतो तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या अशी अट घातली होती, त्यावर स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळकांना उमेदवारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्व विचार करेल. चंद्रकांत पाटील यांची भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पक्षात कुणीही कुणाला डावलत नाही, ब्राह्मण समाजाने पक्षासाठी आयुष्य दिलं आहे. पक्षानेही ब्राह्मण समाजाला खूप काही दिलं आहे. पक्षात आधी ब्राह्मण समाज आणि नंतर ओबीसी समाज आहे असंही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. महाविकास आघाडी एक पाऊल मागे आल्यास आम्ही एक पाऊल मागे येऊ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं असून बिनविरोध निवडणुकीचा चेंडू आता कॉंग्रेसच्या कोर्टात गेला आहे.