समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम करा : नाना पटोले

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाने सुरु केलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या उपक्रमांची मदतच होईल. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत त्याच प्रकारे शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभाग योग्य ती मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला या विभागाचे अध्यक्ष ऍड. रवी जाधव, निवृत्त न्यायाधिश अभय ठिपसे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व विधी विभागाचे प्रभारी विपुल माहेश्वरी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, दिपक तलवार, अंनिसचे अविनाश पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस ही एक विचारधारा आहे, तीला कोणीही संपवू शकत नाही. देश आज एक मोठ्या संकटाचा सामना करत असून देशावरचे हे संकट दूर करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहेत. आपल्याला स्वातंत्र्य भिकेत मिळालेले नाही तर मोठ्या संघर्षाने मिळालेले आहे. आज हे स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागणार आहे.

रवी जाधव म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाच्या वतीने तीन महत्वाचे उपक्रम हाती घेतलेले आहेत. राजीव गांधी राष्ट्रीय विधी सहाय्य व मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने विधी व्याख्यानमाला राज्यात सुरु केल्या जाणार आहेत तसेच माहिती अधिकार कायदा (आरटीआय) सहाय्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. आरटीआय सहाय्य केंद्राकडून मोफत सहकार्य दिले जाणार आहे त्यासाठी ८१६९०१८१८७ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

निवृत्त न्यायाधिश अभय ठिपसे यावेळी बोलताना म्हणाले की, समाज, शासन व लोकशाही व्यवस्थेमध्ये वकिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. वकील समाजाला दिशा देऊ शकतात त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचे मुलभूत अधिकार अबाधित राखण्याचे काम न्यायपालिकेचे आहे. वकिली हा पेशा असला तरी गरीब व गरजू लोकांना पैशाची अपेक्षा न ठेवता कायदेशीर सहाय्य देण्याचे कामही करावे.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी म्हणाले की, आरएसएसच्या विचारसरणीने देशात समाज विभाजनाचे काम केले आणि आता मानसिक विभाजन केले आहे. मुंबईच्या तेजपाल हॉलमध्ये ७६ विद्वानांनी एकत्र येऊन ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळत नव्हता त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. आज पुन्हा एकदा याच मुंबईत विधिज्ज्ञ एकत्र आलेले आहेत. आता एक नवा इतिहास लिहायची आपल्यावर वेळ आलेली आहे. २०१४ पासून देशात चुकीचा इतिहास मांडला जात आहे, सोशल मीडियावर अपप्रचार केला जात आहे हा अपप्रचार व चुकीची माहिती खोडून काढण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे. यावेळी लोकशाहीचे योद्धे सन्मान देऊन वकीलांचा सत्कार करण्यात आला.