‘होय आमच्यावर दबाव होता, पण लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कुणाच्या दबावाला बळी पडत नाही’

Ajit Pawar- आमच्यावर दबाव होता अशी टिका केली जाते… होय आमच्यावर दबाव होता…. पण लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी… आमदारांच्या कामांवर स्थगिती आली होती. ती काढावी म्हणून दबाव होता… आम्ही दबावाला बळी पडणारे नाही… माझी शेतकऱ्याची औलाद आहे. जे बोलतो ते खरे बोलतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी कोल्हापूरच्या उत्तरदायित्व सभेत विरोधकांना सज्जड इशारा दिला.

आई अंबाबाई राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर कर असे साकडेही अजित पवार यांनी यावेळी घातले. कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी. जातीय सलोखा बिघडू नये म्हणून यासाठी काम करत आहोत. ३१ मार्च २०२४ पर्यंत शिवाजी विद्यापीठाला पैसे मिळतील असे आश्वासन देतानाच भाषणात सांगून कामे मिळत नाही. त्यासाठी आयटी कंपनी इथे येतील असे वातावरण तयार करा असे आवाहन केले व यासंदर्भात बैठक घेतली आहे. राज्याचा सर्वांगिण विकास कसा होईल आणि त्या त्या भागातील काम पूर्ण कसे होईल असा प्रयत्न केला जात आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

काही लोकांना अनुदान मिळाले नाही. जेवढे वंचित राहिले आहेत त्यांची यादी द्या सहकारमंत्री यांच्याकडे द्या ती यादी पुरवण्या मागण्यात घेईन असेही अजित पवार म्हणाले.

स्वार्थासाठी आम्ही महायुतीत गेलो नाही तर लोकांच्या कामाचा दबाव होता. माझे सर्व लोकांची कामे करणारे सहकारी आहेत म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो. संधी मिळाल्यावर लोकांची कामे केली पाहिजे लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही सत्तेत गेलो. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडणार होते त्यावेळी सर्व आमदारांनी महायुतीत सहभागी व्हा असे पत्र दिले. हे खोटे असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. आहे तयारी का? असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी दिले.

कोल्हापूरकरांचा सर्वंकष विचार केला जात आहे. सकारात्मक टिकेचे स्वागत आहे परंतु विरोधासाठी टिका नको. सत्ता बहुजनांचा विकास करण्यासाठी हवी. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र नुसता बोलून उपयोग नाही तर ते सत्यात आणण्यासाठी सत्तेत सहभागी झालो हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

परंतु हल्ली कोण पण उचलली जीभ लावली टाळ्याला अशापध्दतीने टिका करतात. विचारांची लढाई लढली पाहिजे. विरोधाला विरोध ही माझी पध्दत नाही तो माझा स्वभाव नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या चर्चेत आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावता कामा नये. काही मराठा मंत्री झाले परंतु याच समाजातील हलकी कामे करत आहे. गरीब आर्थिकदृष्ट्या आहे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. जरांगे यांना सांगत आहोत ते ऐकत नाहीत. त्यासाठी उद्या राज्यातील सर्व पक्षांना सह्याद्रीवर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. चर्चा व्हायला हवी ती थांबवता कामा नये असेही अजित पवार म्हणाले.

जे साखर कारखाना चालवतात त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीसा येत होत्या. शेतकऱ्यांच्या एफआरफीवर त्याचा परिणाम होत होता. त्यासाठी कितीतरी वेळा दिल्लीला आम्ही गेलो परंतु काही उपयोग झाला नाही मात्र आता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आणि तो प्रश्न सुटला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महायुतीत गेलो तर चुकलं कुठे… क्रांतीकारी निर्णय झाला तर का पाठिंबा द्यायचा नाही याचं उत्तर कुणाकडे आहे का? याचं उत्तर कोणाकडे नाही असे अनेक प्रश्न अजित पवार यांनी केले.

कारखाने बंद पडणार होते ते सुरु होणार आहेत मग आम्ही सत्तेत जाऊन आमचं काय चुकलं… महिलांना आमदार व खासदार आरक्षण मिळायला हवे ही आमची मागणी आहे ही मागणी चुकीची आहे का? शाहू महाराजांनी महिलांना सन्मान दिला आम्हीही देत आहोत तर काय चुकलं काय असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

कोल्हापूरातील खासबागेविषयी माहिती आहे. तिथे अनेक तालमी आहेत या तालमीला जिल्हा नियोजनमधून निधी देण्याचा निर्णय उद्याच काढतो असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.

आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणून आम्ही हे सांगू शकतो मात्र काही लोक आमची बदनामी करत आहेत. राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे. शहरे वाढत असतात. विनंती आहे टोल माफ करण्यासाठी सरकारला वाकवलं तसं कोल्हापूरची पुढची ५० वर्षे डोळयासमोर आणा. लगतची गावे तातडीने घ्यायला हवीत. आम्ही तुम्हाला मदत करु. आपण राजकारण न आणता एकोपा दाखवा. जे विरोध करत आहेत त्यांना विनंती आहे. ज्या त्या वेळी काम झाले पाहिजे नाहीतर काय होते ते आम्ही अनुभवले आहे त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बाबांनो या कामात मदत करा विकासाला निधी द्यायला कमी पडणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला.

पंचगंगा प्रदूषण हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित होत आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे सरकार म्हणून मदत करायला तयार आहोत असा शब्दही अजित पवार यांनी कोल्हापूरकरांना दिला.

तुम्ही साथ द्या विकासाची कामे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. मी बोलतो ते करतो. आमचे नेते काम करण्यासाठी कटिबद्ध राहतील असे सांगतानाच आम्ही तुमचे प्रश्न तडीस लावू असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.

प्रत्येक समाजाची गरज ओळखून आम्ही काम करतो म्हणून आम्ही बहुजनांच्या कल्याणासाठी सत्तेत सहभागी झालो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, युवा नेते पार्थ पवार, युवा नेते नावेद मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार मकरंद पाटील, आमदार मानसिंग गायकवाड, माजी आमदार के. पी. पाटील, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिलाध्यक्षा शितलताई फरादपे, युवक शहराध्यक्ष आदील फरास आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित