सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप

पुणे  – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथे विविध प्रकराच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.पाटील यांच्या निर्देशानुसार हवेली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड येथे विविध दाखले जागेवर उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे.

या सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या माध्यामातून विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपिता महत्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा  पाटील यांनी विशेष उल्लेख केला.

यावेळी  पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी ५२ नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, १८ रहिवास प्रमाणपत्र, २२ डोमेसाईल प्रमाणपत्र, १२ प्रतिज्ञापत्र आणि २१ सातबारा असे १२५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तहसिलदार तृप्ति कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.