उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई करत गिर्यारोहकांनी दिला  ‘लेक वाचवा’चा दिला संदेश

पुणे  –  गिर्यारोहकांच्या चढाईसाठी नावाप्रमाणेच अजस्त्र उत्तराखंडमधील काला नाग ( ब्लॅक पीक ) पर्वतावर चढाई करण्याचा पराक्रम पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी केला. यामध्ये भोसरीतील बाल गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिचा समावेश आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी उत्तराखंड येथील ६३८७ मी उंचीच्या शिखरावर ६ ०१० मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली. बंदरपूंछ पर्वतरांगेतील अतिदूर्गम व अजस्त्र असा ब्लॅक पीक (काला नाग) पर्वत आणि त्यावर असणाऱ्या हिमभेगा, चढाईसाठी ७५-८० अंश कोनात असणारा तीव्र चढ आणि उणे १५-२० अंश सेल्सियस असणारे तापमान यामुळे चढाईसाठी अतिकठीण मानला जातो. या शिखरावर चढाईची मोहीम दि.२६ अॅागस्ट ते १० सप्टेंबर या दरम्यान आखली होती.

यामध्ये एकूण ८ गिर्यारोहकांचा सहभाग होता. वय वर्षे १३ पासून ते वय वर्षे ५१ पर्यंतचे गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले . यामध्ये कु. गिरीजा धनंजय लांडगे (१३ वर्षे ), धनंजय सयाजी लांडगे, गोपाल भिमय्या भंडारी, ओंकार सुभाष पडवळ, शालिनी शर्मा, निखिल किसन कोकाटे, सुनिल पिसाळ (५१ वर्षे ), विश्वजीत पिसाळ ( ५० वर्षे ) यांनी सहभाग घेतला. एकूण १५ दिवसांची मोहीम होती.

गिर्यारोहक धनंजय लांडगे म्हणाले की, सुरुवातीचे २ दिवस पुणे ते देहरादून रेल्वे प्रवास करून आमची टीम देहरादून येथे पोहोचली, ही मोहीम सेमी अल्पाईन पद्धतीची असल्याने सोबत असलेले तांत्रिक साहित्य वगळता मोहीमेसाठी लागणारे सर्व किराणा , भाजीपाला साहित्य बाजारातून गोळा करून लोकल गाईडच्या साह्य्याने टिमने पुढील प्रवासाला सुरूवात केली. सांक्री ते तालूका या गावांदरम्यानचा गाडीप्रवास चालू असताना तीन ठिकाणी भूस्खलन सारख्या नैसर्गिक संकटावर मात करत पुढे जावे लागले.

सेमी अल्पाईन पद्धत असल्याने मोहीमेसाठी लागणारे साहित्य जवळजवळ प्रत्येकी २५ किलो वजन घेऊन तालूका – गंगाड – सीमा – रुईनसारा लेक – क्यारकोटी बेस कॅंप – अॅडव्हान्स कॅंप पर्यंत रोज सरासरी ९-१० किमी पायी ट्रेक करत व रोज ५००-७०० मीटर पर्यंत उंची गाठत सर्वजण कॅंप पर्यंत पोहोचले. दरम्यान, जाताना टीमला भूस्खलनसारख्या नैसर्गिक अडचणीला सामोरे जावे लागले . बेस कॅंप पर्यंत पोहोचण्यासाठी आलेल्या अनेक अडचणींवर मात करत , अगदी टिमने बेस कॅंप ते समिट कॅंप पर्यंत भूस्खलन (Land Slide) ने पूर्णपणे बंद झालेल्या रस्त्यांवर स्वतः रस्ता तयार करत , नैसर्गिक अडचणींवर मात करत सम्मीट कॅंप गाठला. अनेक नैसर्गिक अडचणींवर मात करीत मोहीम यशस्वी करण्याची जिद्द आम्ही ठेवली होती.

“लेक वाचवा , लेक जगवा , लेक वाढवा’’चा संदेश…

महाराष्ट्रातील पहिली टीम कि ज्या टिमने कालानाग ( ब्लॅक पीक) पर्वतावर ६०१०मी. पर्यंत यशस्वी चढाई करून तिरंगा ध्वज फडकावत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. तसेच, “लेक वाचवा , लेक जगवा , लेक वाढवा’’चा संदेश देण्यात आला. या मोहीमेत रोज सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या गिर्यारोहण मोहीमेस दूर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था , सह्याद्री रोव्हर्स , ध्यास सह्याद्री , शिवदुर्ग मित्र लोणावळा ,महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन,  अॅडव्हेंचर डायरीज , ॲडव्हेंचर मंत्रा , माऊंटेन स्पोर्टस ॲकॅडमी या संस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच अशी मोहीम संयुक्तिक पणे राबवण्यात आली, अशी माहिती गिर्यारोहक धनंजय लांडगे यांनी दिली.