भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने राष्ट्रावादीच्या नेत्यालाही अश्रु अनावर, अंकुश काकडे ढसाढसा रडले

Pune: महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत दुख:द बातमी पुढे आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गिरीजा बापट आणि मुलगा गौरव बापट व सून असा परिवार आहे.

दरम्यान, बापट यांच्या निधनानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांना प्रतिक्रिया देत असतांना अक्षरशः अश्रु अनावर झाले.गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांची चांगली मैत्री होती. पुण्यातील राजकारणात अंकुश काकडे आणि गिरीश बापट हे एकमेकांचे विरोधक असले तरी त्यांची मैत्री सर्वश्रुत होती. बापट यांच्या निधनावर अंकुश काकडे यांना बोलतांना रडायला आले.

पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले गिरीश बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेली ३० ते ३५ वर्षे आम्ही राजकारणात एकत्र काम केले. गेल्या काही महिन्यांपासून गिरीश बापट श्वसनाच्या विकाराने आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही ठिकाणी अतिशय उल्लेखनीय काम करणारा सहकारी गेला. याचे मला अतिशय दु:ख आहे. पुणे शहराची ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दांत अंकुश काकडे यांनी शोक व्यक्त केला.