५ हजार घ्या, चहा नाष्टा करा आणि सभेला या, मनसेच्या सभेला पैसे देऊन गर्दी – खैरे 

औरंगाबाद  –   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असून बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेसह सत्ताधारी लक्ष ठेवून आहेत.

या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होतेय.

दरम्यान,   या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून लाखोंची गर्दी जमा होणार असल्याचा दावा केला जातोय. मात्र जमा होणारे लोक हे पैसे देऊन आणले जात असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत (Chandrakant Khaire) खैरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दी विषयी माध्यमांनी चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी ही सभा स्पॉंन्सर असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पत्रकारांनाच आवाहन केलं आहे की, तुम्ही मला विचारण्यापेक्षा तिथे जमलेल्या लोकांना विचारा कुठून आले, किती पैसे मिळाले?. लोक स्वत: तुम्हाला याची माहिती देतील. त्यामुळे या सभेला लाख काय, पाच लाख सुद्धा लोकं आली तर आम्हाला फरक पडणार नाही. हा शिवसेनेचा गड आहे. आमच्या जुन्या मित्राच्या (भाजपच्या) पाठिंब्यानेच ही गर्दी जमवली जात असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘मला वैजापूर आणि औरंगाबादच्या ग्रामीण भागातून फोन आले. ५ हजार रुपये घ्या, चहा नाष्टा करा आणि सभेसाठी हजर रहा अशी ऑफर त्यांना मिळाली आहे. त्यामुळे ही सभा पूर्णपणे स्पॉंन्सर आहे. या सभेला येणारे लोक पैसे घेऊन येणार आहे. त्यामुळे अशा सभेमुळे आमचं वातावरण अजिबात खराब होत नाही’ असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.