‘अल्टिमेटम वैगरे शब्द मी ..,’; सुप्रिया सुळे यांचा राज ठाकरेंना चिमटा

मुंबई  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असून बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेसह सत्ताधारी लक्ष ठेवून आहेत.

या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होतेय.

दरम्यान, राज ठाकरे यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या औरंगाबादेतील सभेसाठी शुभेच्छा दिल्या. तर, राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्या दिवशी ईद देखील आहे, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अल्टिमेटम वैगरे शब्द मी ज्या संस्कृतीत लहानाची मोठी झाले त्यात बसत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी हा शब्दच कधी वापरला नव्हता. त्यामुळे मला फारसा त्या शब्दाचा अर्थ समजत नाही. इंग्रजीत डिक्शनरीत काहीतरी आहे त्याचा अर्थ. पण, मला असं वाटतं की या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचं अतिशय सक्षम असं सरकार आहे, जे चांगलं काम करतय. हे केवळ मीच म्हणत नाही तर केंद्र सरकारची आकडेवारी देखील हेच सांगते आहे. याचबरोबर एक कार्यक्षम असे गृहमंत्री देखील आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवूयात.”असं त्या म्हणाल्या.