‘राहुल गांधीवर टीका करणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात?’

मुंबई – भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ममता यांचे हे वक्तव्य कॉंग्रेस नेत्यांना आता चांगलेच झोंबले आहे असे दिसत आहे. ममता बँनर्जींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी गांधी मागे हटले नाहीत असं थोरात म्हणाले.

देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात? असा थेट सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.