माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू?  – उद्धव ठाकरे 

  मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, २०१२ साली बाळासाहेब आपल्यातून गेले आणि त्यानंतर २०१४ साली आपण एकटे लढलो. तेव्हाही आपण हिंदूच होतो. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले होते. मधल्या काळात जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे मिळालं हे लक्षात ठेवा.मला कशाचाही अनुभव नसताना मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पुरा करणारच.

पवासाहेबांच्या सूचनेनं मुख्यमंत्रिपद मिळालं. पवारसाहेब, सोनियाजींनी विश्वास ठेवला पण आता माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार. आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.