सहकार चळवळ टिकावी यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक – छगन भुजबळ

नाशिक :- राज्यातील सहकार क्षेत्राने देशाला दिशा दिली आहे. मात्र या सहकार क्षेत्रात काही मंडळींनी स्वाहाकार केल्याने राज्यातील सहकार अडचणीत आले आहे. त्यामुळे अडचणीत आलेला हा सहकार पुन्हा वाढवायचा असेल तसेच ही चळवळ टिकावी यासाठी तर सर्वांनी एकत्रित येऊन सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे, महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था सातपूर नाशिक व नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर येथे दोन दिवसीय सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सहकार मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महारुद्र पतसंस्थेचे संस्थापक सदाशिव माळी, परसरराम गिरी महाराज, नारायण वाजे, ॲड.अंजली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष गोरख बोडके, गोविंद माळी, श्रीराम मंडळ यांच्यासह पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सन १९१२ साली सहकारी संस्थांचा कायदा सावकारीतून सामान्य जनतेची मुक्तता, सहकार चळवळीला प्रोत्साहन आणि त्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने राजर्षी शाहूंनी हिंदुस्थान सरकारचा १९१२ चा को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा सर्व कलमांसह १ जून १९१३ रोजी करवीर संस्थानात लागू केला. महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांपासून सहकाराची सुरुवात झाली. ही सहकार चळवळ पुढे वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील ते आता शरदचंद्र पवार साहेब यांनी रुजविली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सहकारी चळवळीने देशातील कोट्यवधी लोकांना आपल्या पायावर उभं केलं. सहकारी चळवळीने महाराष्ट्रातील शेतकरी ताठ मानेने उभा राहिला. त्याचा अभ्यास देशातील इतर राज्यांनी केला आणि आपल्या राज्यातही ही चळवळ रुजविण्याचा प्रयत्न केला. सर्वांसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते जोपर्यंत सहकारात होते, तोपर्यंत सहकार चळवळीला देशभर भरभराट लाभली होती. मात्र सर्वांच्या हितापेक्षा स्वहित जपण्यास सहकारात सुरवात झाली त्यामुळे सहकारला गिळंकृत केले. आज सहकार क्षेत्रातील बहुतांश संस्था आजारी आहेत. काही संस्था बंद पडल्या तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, नाशिक जिल्हा बँकेच्या प्रश्न तसेच राज्यातील पतसंस्थाच्या प्रश्नावर लवकर उपमुख्यमंत्री व सहकार मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन या संस्थांचे प्रश्न सोडविले जातील. शासन म्हणून या पुढील काळात सहकार क्षेत्रातील ज्या अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्याचे अन्न नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सुरेश वाबळे,  वासुदेव काळे, गोरख चव्हाण, सौ.निलिमा ताई बावणे,  संदीप माळी, शशिकांत साळुंखे यांचा सहकार मित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.