खाजगी डॉक्टरांकडे रुग्णसेवेची भीक मागणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर : डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णाचे हाल पाहवत नाहीत. डॉक्टरांनी मानवतेच्या दृष्टीकोणातून महिन्यातील कीमान एक दिवस गोर गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी खाजगी डॉक्टरांना रुग्ण सेवेची भीक मागणार असल्याचे भावनीक उद्गार सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी काढले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महानगरपालीका आयुक्त अनिल पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजिता महापात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजिव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भांबरे तसेच जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मागील काही दिवसामध्ये जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असून या पावसामुळे नागरीकांचे तसेच शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसात पंचनामे पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात सागरी भाग, नागरी भाग, आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात अल्यामुळे या भागातील आरोग्य व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यासाठी योगदान देण्याऱ्या खाजगी डॉक्टरांचा जिल्हा नियोजन समितीद्वारे सत्कार करण्यात येणार आहे. हि प्रेरणा इतर डॉक्टर घेतील आणि ते सुध्दा रुग्णसेवेसाठी योगदान देतील असा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात झालेल्या पूर परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा पुरेशा पद्धतीने कार्यक्षम नसल्याचे पालकमंत्री तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी या बैठकीत नमूद केले. अधिक तर अधिकारी व कर्मचारी आपल्या मुख्यालय ठिकाणी राहत नसल्याचे आपल्या निदर्शनास आले असून अशा संबंधितांवर कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधींद्वारे दक्षता ठेवण्याची योजनेची पालकमंत्री यांनी या बैठकीत घोषणा केली. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने शहानिशा करावी व मुख्यालय ठिकाणी न राहणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्याच्या सूचना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या.