‘कॉंग्रेसने एक गोष्ट लक्षात ठेवावी की मोदीजी को हराना मुश्किलही नही नामुमकीन है’

नाशिक –  पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्यावर पंजाब मधे प्राणघातक हल्याचा काँग्रेसचा कट होता; मात्र ईश्वराच्या कृपेने पंतप्रधान यातून सुखरुप बाहेर पडले.  नरेंद्र मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र च्या वतीने आज सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या हस्ते रुद्राभिषेक, आरती तसेच ‘महामृत्युंजय मंत्रजाप’ करण्यात आला.

या कार्यक्रमात महंत भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतिश शुक्ल, भाजपा नाशिक सरचिटणीस सुनिल केदार, कार्यालय प्रमुख मेघना आंबेकर, पंचवटी मंडलाध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सरचिटणीस प्रतिक शुक्ल, ज्येष्ठ नेत्या सुजाता करजगीकर, निखिल आंबेकर आदिंसह पुरोहित व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, पंजाब मधे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यावर हल्ला करण्याचा काँग्रेसचा कट होता मात्र हिंदुस्थानच्या १३५ कोटी जनतेचा आशिर्वाद आणि ईश्वराची असीम कृपा यामुळे मा. पंतप्रधान यातून सुखरुप बाहेर पडले. यापुढे त्यांना दीर्घायु व निरोगी आयुष्य लाभावे तसेच त्यांचे हात अधिक बळकट होऊन त्यांच्या द्वारा भारतमातेची अविरत सेवा घडावी यासाठी आम्ही आज अभिषेक व महामृत्युंजय मंत्रजाप केला आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वात कमकुवत झालेल्या काँग्रेसने हा भ्याड प्रकार केला पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मोदीजी को हराना मुश्किलही नही नामुमकीन है ! गांधी घराण्याच्या कितीही पिढ्या खाली आल्या तरी मोदीजींना हरवणं शक्य नाही. त्यांच्यावर साक्षात् ईश्वराची छत्रछाया आणि सबंध हिंदुस्थानचे आशिर्वाद आहेत असं देखील ते म्हणाले.