ज्ञानवापी प्रकरण : मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे – शरद पवार 

केरळ – वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये (Gyanvapi Masjid case)  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे.

ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवार म्हणाले,  वाराणसीत मंदिर आहे. मंदिराला कुणाचा विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही.

दरम्यान, महागाईवरून देखील केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,  देशात कधी नव्हे एवढी महागाई वाढली आहे. केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारची भूमिका घेत आहे, ती कदापिही योग्य नाही, असे सांगत  पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.