जावेद हबीबच्या अडचणी वाढल्या; गुन्हा दाखल झाला, महिला आयोगानेही नोटीस पाठवली

मुजफ्फरनगर –थुंकून केस कापल्याप्रकरणी प्रसिद्ध ब्युटीशियन आणि हेअर डिझायनर जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात पीडित महिला पूजा गुप्ताने जावेद हबीबविरुद्ध कलम ३५५, ५०४ आयपीसी, ३ महामारी कायदा आणि ५६ आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. जावेद हबीब यांना आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही करण्यात आली होती. महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत पत्र पाठविले आहे.

या व्हिडिओची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याने या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. ”हबीब यांच्यावर कठोर कारवाई करावी,” असे संबधित महिलेने म्हटले आहे. या महिलेच्या केसात थुंकल्यानंतर जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे व्हिडिओमध्ये सांगत असल्याचे दिसत आहे. साथीच्या कायद्याशी संबंधित कलमांतर्गत जावेद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.