२६ ऑगस्ट २००१ ला नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात?

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चेतावणी देत आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील आणि आम्ही मुलाखत घेतली तर अनेक गौप्यस्फोट आणि भूकंप होतील असा इशारा दिला होता. यावेळी बोलताना त्यांनी दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही शिंदे म्हणाले होते.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत खूप काही झालं. सिनेमा हे फक्त उदाहरण आहे. दिघे यांच्या जीवनामध्येही ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. मी योग्य वेळी नक्की बोलेन,” असे एकनाथ शिंदे मालेगाव येथे भर सभेत म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे काय झाले घात की अपघात? अश्या आशयाचे बॅनर लागले आहेत.

ठाण्यातील चंदनवाडी भागात मनसैनिक महेश कदम (Mahesh Kadam) यांनी हे बॅनर लावले आहेत. 26 ऑगस्ट 2001 नक्की आमच्या धर्मवीरांचं काय झालं? घात कीअपघात ? लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात धर्मवीर आनंद दिघे यांचा नावाचा मुद्दा उचलून राजकारणाला वेगळे वळण येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.