‘संजय राऊतांसारखा महारथी लढतोय, झुकत नाही…अशाच दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे औरंगजेब थकला’

मुंबई – शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. संजय राऊतांच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. दुसरीकडे ईडीकडून आज संजय राऊत यांना न्यायालयात हजर केलं जाईल.

गोरेगावातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना अटक केल्यानं शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींवर कॉंग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, संजय राऊत यांची अटक – देशातील भयाण वास्तवाची जाणीव करून देणारी! संजय राऊतांसारखा महारथी लढतोय, झुकत नाही. अशाच दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे औरंगजेब थकला. हे ही थकतील! यातूनच हजारो क्रांतीचे नेते तयार होतात, होतील..सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश, पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश असं सावंत यांनी म्हटलं आहे.