मुंबईत कोरोनाचा कहर; राज्यातील ‘या’ शहरांमध्येही वाढतेय झपाट्याने रुग्णसंख्या 

मुंबई – काल आढळलेल्या एकंदर कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक म्हणजे 19 हजार 780 बाधित एकट्या मुंबईतले आहेत. त्याखालोखाल ठाणे मनपा क्षेत्रात 2 हजार 370, पुणे मनपा क्षेत्रात 2 हजार 318, तर नवी मुंबईत 2 हजार 297 नवबाधित आढळून आले आहेत. कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातही एक हजारांहून अधिक नवीन बाधितांची नोंद झाली आहे.

राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून 1 लाख 14 हजार 847 झाली आहे. काल दिवसभरात 8 हजार 907 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 पूर्णांक 17 शतांश टक्के आहे. राज्यात काल दिवसभरात 13 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यातला मृत्यूदर 2 पूर्णांक 08 शतांश टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर 1 हजार 368 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या तब्बल 36 हजार 265 नवबाधितांची नोंद झाली. विषाणू संसर्गाचा हा वेग प्रचंड असला तरी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ञ करत आहेत.

राज्यात दैनंदिन कोरोना बाधितांचा आकडा मोठा असला तरी अनेक रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत; तसंच बाधितांना रुग्णालयात भरती करण्याचं प्रमाणही तुलनेनं कमी आहे, असं राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी समाज माध्यमावर प्रसारित केलेल्या तपशीलात म्हटलं आहे. असं असलं तरी निष्काळजीपणा न करता कोरोना नियमांचं पालन करायलाच हवं; वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अत्यंत गंभीरपणे नियम पाळावेच लागतील असा सल्लाही डॉ. आवटे यांनी दिला आहे.