वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा होणार सुरु

मुंबई – काल आढळलेल्या एकंदर कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक म्हणजे 19 हजार 780 बाधित एकट्या मुंबईतले आहेत. त्याखालोखाल ठाणे मनपा क्षेत्रात 2 हजार 370, पुणे मनपा क्षेत्रात 2 हजार 318, तर नवी मुंबईत 2 हजार 297 नवबाधित आढळून आले आहेत. कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातही एक हजारांहून अधिक नवीन बाधितांची नोंद झाली आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू लागली आहे. पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे, शिवाजीनगर इथलं जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. लवकरच हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खुलं केलं जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

या जम्बो रुग्णालयात विविध प्रकारच्या एकंदर 800 खाटा असून, त्यापैकी जनरल वॉर्डमधील 200 खाटा सुरुवातीला कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार इतर खाटा उपलब्ध केल्या जातील. या रुग्णालयात शहरातील खासगी डॉक्टरांना नियुक्त करण्याचा विचार असून,वाढती रुग्णसंख्या विचारात घेता गरज पडल्यास प्राणवायूचा पुरवठा करणारी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे, असंही महापालिकेच्या आरोग्य विभागाने आकाशवाणीला कळवलं आहे.