निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली; आता ‘इतके’ पैसे खर्च करू शकणार उमेदवार

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठीच्या सध्याच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली असून येत्या निवडणुकांपासून ती लागू होणार आहे. मोठ्या राज्यांमध्ये निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा 95 लाख रूपये असेल तर लहान राज्यांमध्ये ही मर्यादा 75 लाख रूपये होणार आहे.

या आधी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. ती आता वाढवून 95 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा 28 लाख रुपये इतकी होती. आता त्यामध्ये वाढ करुन 40 लाख रुपये करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक मोठ्या राज्यांसाठी ही वाढलेली खर्च मर्यादा लागू असणार आहे. निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता असते त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला हा खर्च करता येतो.

गेल्या काही वर्षामध्ये देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या काही वर्षामध्ये महागाईतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी अनेक पक्षांनी केली होती. आता केंद्र सरकारने ही खर्च मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.