२३ ते २४ सीमकार्डच्या माध्यमातून चालतोय विद्युत निर्मितीतील भ्रष्टाचार; बावनकुळे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात महापारेषण, महाजेनको आणि महावितरण या तीनही वीज निर्मिती कंपन्या नफ्यात होत्या, असे ठामपणे सांगत राज्याचे माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत विद्युत निर्मिती प्रकल्पाचे वहीखाते सादर केले. या कंपन्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या. त्यात कोण कोण गुंतलंय हे देखील सांगणार असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

वीजबिल थकबाकी भाजपच्या सरकारचे पाप असल्याचे सोमवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत बोलले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आज आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील तीनही विद्युत कंपन्या नफ्यात होत्या. आता त्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या असून त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी त्यांनी विद्युत निर्मिती प्रकल्पाचे वहीखाते सादर केले. या अंतर्गत महापारेषण २०१७-१८ साली ८१५ कोटींच्या, २०१८-१९ साली ७४५ कोटींच्या आणि २०१९-२० साली ४९३ कोटींच्या नफ्यात होती. महाजेनको विद्युत निर्मिती प्रकल्प २०१७-१८ साली ७०० कोटींच्या, २०१८-१९ साली ३३४ कोटींच्या आणि २०१९-२० साली १२६ कोटींच्या नफ्यात होती तसेच तिसरी म्हणजेच महावितरण विद्युत निर्मिती कंपनी २०१७-१८ साली ४४२ कोटींच्या, २०१८-१९ साली ८४६ कोटींच्या आणि २०१९-२० साली २०८ कोटींच्या नफ्यात होती असे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रातील वीज कंपन्या डबघाईस आल्या त्यात भाजपा सरकारचा दोष नाही. आम्ही एकाही शेतकऱ्याची वीज तोडली नाही, तरीही विद्युत निर्मिती कंपन्या नफ्यात चालवल्या. पण आता भ्रष्टाचार वाढला असून, २३ ते २४ सीमकार्डच्या माध्यमातून हा गैरव्यवहार सुरू असल्याचा गौप्यस्फोट आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महत्वाचे म्हणजे यात कोण कोण गुंतलंय याचा लवकरच खुलासा करू, सगळ्या सीमकार्डचे नंबरही सांगू असे आ. बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्रात ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.