विश्वविक्रमी द्विशतकानंतरही इशान किशनला ‘या’ गोष्टीची खंत; म्हणाला, ‘तीनशे…’

चट्टोग्राम: बांगलादेशविरुद्धचा भारतीय संघाचा तिसरा वनडे सामना २४ वर्षीय इशान किशनने गाजवला. इशानने या सामन्यात वादळी द्विशतक ठोकत विश्वविक्रम आपल्या नावावर केले. मात्र या अद्वितीय कामगिरीनंतरही इशान खुश नाही. आपण त्रिशतक पूर्ण न करू शकल्याची खंत त्याला वाटत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला होता. त्यामुळे रोहितच्या जागी सलामीला इशानला (Ishan Kishan) संधी मिळाली. या संधीचे सोने करत इशानने बांगलादेशविरुद्ध शानदार खेळी (Ishan Kishan Double Century) खेळली. त्याने १३१ चेंडूत १० षटकार आणि २४ चौकारांसह २१० धावा फटकावल्या. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठरले. यासह इशान वनडे सामन्यात द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले.

या विक्रमी कामगिरीनंतर त्रिशतक न करू शकल्याची खंत व्यक्त करताना इशान म्हणाला, “मी जेव्हा बाद झालो, तेव्हा जवळपास १५ षटके शिल्लक होती. माझ्याकडे ३०० धावा करण्याची चांगली संधी होती.”

वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी इशानआधी सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी एक तर, रोहित शर्मा याने तीन द्विशतके झळकावली आहेत. या दिग्गजांच्या मांदियाळीत सहभागी झाल्याबद्दल इशान म्हणाला, “या दिग्गजांबरोबर आपले नाव ऐकून मी खूप खुश आहे. चट्टोग्रामची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली होती. माझे मनसुबे स्पष्ट होते, जर चेंडू कमजोर झाला, तर मी त्यावर फटकेबाजी करणार.”