‘उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही,त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे’

मुंबई – राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडाचे धक्के अजूनही पक्षाला बसत असताना विरोधक देखील शिवसेनेवर रोज निशाणा साधताना दिसत आहेत. तर बंडखोर आमदार (MLA) आणखी काही आमदार आणि खासदार सोबत येतील असा दावा करत आहेत.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे आणि आता शिंदे गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी टीव्ही ९ शी बोलताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रीपदाच्या अपेक्षेविषयीही बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, तेव्हा शिंदेंच्या मार्फतच गेलो होतो. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी शब्दही पाळला. उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही. त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे. पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय. ज्या ताकदीनं ते मातोश्रीवरून काम करत होते, त्या ताकदीनं ते वर्षावरून करू शकले नाहीत, अशी खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे.

आम्ही या बंडामागे पद मागत नाही. आम्हाला बरेच कार्यकर्ते म्हणतात की बजेटचं चांगलं पद मिळायला हवं. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम वगैरे. पण आम्ही म्हटलं सामाजिक न्याय विभाग द्या जिथे अपंगांची, दीन-दलितांची सेवा करता येईल”, असं बच्चू कडू म्हणाले.