दलित पँथरचे केंद्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांचा आर.पी.आय (आ.) पक्षात प्रवेश

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथर केंद्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांचा आर.पी.आय पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. नडगम यांच्या प्रवेशाची घोषणा करतांना आठवले म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे यशवंत नडगम व त्यांचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी माझी भेट घेतली असता अनेक विषयांवर तेथे चर्चा झाली. आज नडगम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आर. पी. आय मध्ये प्रवेश केला; त्यांचे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे पक्षात स्वागत करतो. लवकरच त्यांना सन्मानाच स्थान पक्षात मिळेल असेही आठवले यावेळी म्हणाले.

गेल्या वीस वर्षांपासून पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सोबत चळवळीत सक्रिय सहभागी होऊन महाराष्ट्रभर समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नडगम यांनी दलित पँथर मधून काम केले. आंदोलन, मोर्चे, संघटना बांधणी, विविध सामाजिक उपक्रमातून जनतेशी घट्ट नाळ यशवंतभाऊ नडगम यांची महाराष्ट्रात पाहायला मिळते. त्याच कामाला अजून जोमाने पुढे नेण्यासाठी बळ मिळावे यासाठी हा प्रवेश करण्यात आला.

यशवंत नडगम म्हणाले, दलित पँथर संघटना आहे त्यांच पद्धतीने पुढेही काम करेल, संघटनेचे काम आणि पक्ष प्रवेश दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. अंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून काम करत असतांना रामदास आठवले साहेब यांना व त्यांच्या कार्याचा परिचय मला आहे, आरपीआय मध्ये गेल्यावर नक्कीच दलित पँथरचे काम महाराष्ट्रात अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. येणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आठवले साहेबांच्या आशिर्वादाने आम्ही काम करून दलित पँथरची विजय पताका महाराष्ट्रात फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.