एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंकडून जीवाला धोका, चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप

जळगाव : राज्यात एकीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना रोहिणी खडसे यांनी आता आम्ही आमदारांना चोप देऊ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याच प्रतिक्रियाच्या आधारे त्यांनी हा आरोप केला आहे.

मागील दोन वर्षांपासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांच्यावर नाव न घेता केले. माझ्या जिवाला धोका असून याबाबत पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसेंमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली होती. आता महाविकास आघाडी तुटू नये, अशी अपेक्षाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

वाद कसा सुरु झाला ?

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीचे मतदान २१ डिसेंबर रोजी पार पडले असून, मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यानंतर रोहिणी खडसें यांनी महिलांची छेडखानी करणाऱ्यांना चोपच नाहीतर तर त्यांचे हात तोडून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.