कोश्यारींच्या पापाची फळे भाजपला भोगावी लागतील – नाना पटोले 

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून  केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठीच त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदी बसवले होते. राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यापासून कोश्यारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांनी राज्यपालपदाची गरिमा घालवली.

विधानरिषदेच्या आमदारांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा विविधप्रसंगी ते निष्पक्षपणे न वागता भाजपचे एजंट असल्याप्रमाणे वागले. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि शिंदे भाजपचे सरकार स्थापनावेळी त्यांनी नियम कायदे पायदळी तुडवून दाखवलेली विशेष सक्रियता राज्यपाल कसे असू नयेत याचे उदाहरण आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या इशा-यावर रोबोटप्रमाणे काम करणारे कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपास कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण आहेत. राजभवनात बसून त्यांनी केलेले राजकारण राज्यातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. केंद्र शासनाने त्यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करत त्यांना सन्मानाने निवृत्ती दिली. कोश्यारींनी अनेकवेळा घटनेची पायमल्ली केलेली आहे. केंद्राने त्यांची हकालपट्टी करून चौकशी लावली असती तर केंद्र सरकारची घटनेप्रतिची निष्ठी दिसली असती. पण केंद्र  सरकारने कोश्यारींच्या पापावर पांघरून घालून त्यांना माफ केले असले तरी राज्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही.

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या पावलावर पावले न टाकता, निष्पक्षपणे कार्य करावे आणि कोश्यारींनी घालवलेली राज्यपाल पदाची गरिमा पुर्नस्थापित करावी अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.