शिंदे-फडणवीसांच्या जम्बो मंत्रिमंडळात या आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी ?

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

या सरकारचा येत्या आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपा, अपक्ष, शिंदे गट व इतर छोट्या पक्षांचे अनेक आमदार मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रत्येक आमदार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र, सर्व मिळून ४३ मंत्रीपदे आहेत.त्यापेक्षा जास्त मंत्री करता येत नाहीत. त्यामुळे शिंदे गट, अपक्ष व छोट्या पक्षांच्या अपेक्षा पाहता मंत्रीपदांचे वाटप करताना शिंदे – फडणवीस यांचा चांगलाच कस लागणार आहे.

नव्या मंत्रिमंडळामध्ये विद्यमान मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर (Uday Samant, Gulabrao Patil, Abdul Sattar, Sandipan Bhumare, Dada Bhuse, Shambhuraj Desai, Bachchu Kadu, Rajendra Patil-Yadravkar) यांच्यासोबत नव्याने दीपक केसरकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत, संजय राठोड, शहाजी पाटील (Deepak Kesarkar, Sanjay Shirsat, Bharat Gogavale, Tanaji Sawant, Sanjay Rathod, Shahaji Patil) यांची शिंदे गटाकडून वर्णी लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे.तसेच, अपक्षांसह छोट्या पक्षातील दोघे मंत्रिमंडळात असू शकतात.

भाजपमध्ये मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद जाण्याची दाट शक्यता आहे. कारण मागील काळात त्यांनी हे पद स्वतःकडेच ठेवले होते. सत्ताप्राप्तीसाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा राजकीय वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता. याशिवाय सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील (Sudhir Mungantiwar, Ashish Shelar, Girish Mahajan, Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, संभाजी पाटील-निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील, संजय कुटे, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, जयकुमार गोरे, विनय कोरे, राम शिंदे किंवा गोपीचंद पडळकर, नीतेश राणे, महेश लांडगे किंवा राहुल कुल असे मंत्री होतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.