शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात, जाणून घ्या कशी आहे त्यांची प्रकृती

Yogesh Kadam Accident: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे (शिंदे गट) नेते योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीचा काल रात्री (०६ जानेवारी) अपघात झाला. पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. टँकरने मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली आहे, परंतु सुदैवाने ते सुखरुप आहे. त्यांच्या ड्राइव्हरला थोडी दुखापत झाली असून त्यांना चोळई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. मागून आलेल्या टँकरने योगेश कदम यांच्या गाडीला मारलेली धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात टॅंकर पलटी झाला आहे. यानंतर टँकर चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.

माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम यांनी माध्यमांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. योगेश कदम म्हणाले, “मी मुंबईला जात असताना माझा अपघात झाला. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.”

“आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आज आम्ही एका मोठ्या अपघातातून वाचलो आहोत. मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही,” अशी माहिती योगेश कदम यांनी दिली. तसेच पुढील सर्व नियोजित कार्यक्रम आपण पार पाडू असेही त्यांनी म्हटले आहे.