‘कृषी क्षेत्रात शरद पवार यांनी अतिशय मोलाचे योगदान दिलं, त्यामुळे देश अन्नधान्य पिकविण्यात सक्षम झाला’

नाशिक  :- शेतीसाठी विविध प्रकारची संशोधने आज होत आहेत व ही संशोधने सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत पोहोचली तरच शेतीचा विकास होणे शक्य आहे. कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या या सर्व वस्तू, संशोधन आणि तंत्रज्ञान या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत असतात. त्यातून शेतकऱ्यांची सेवा होत असते. शेतकऱ्यांची ही सेवा खरी मानव जातीची सेवा आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले

डोंगरे वसतीगृह नाशिक येथे ॲग्रोवर्ल्ड ग्रँड ॲग्री आणि डेरी एक्स्पोचा शुभारंभ व ॲग्रोवर्ल्ड ऋषी कृषी पुरस्काराचे वितरण छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.प्रदर्शनाचे आयोजक शेलेंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, स्वप्नील चौधरी, श्रीराम पाटील, संजय फडोळ, चंद्रकांत बनकर, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेले नागरिक आता शेती क्षेत्राकडे वळता आहे. हा बदल अतिशय सकारात्मक असून शेती क्षेत्रात नवीन क्रांती होताना दिसत आहे. सद्या नवनवीन संकटाना सामोरे जात शेती केली जात आहे. या संकटांवर मात करून शेती करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत आहे. यामध्ये तरुण शेतकऱ्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. त्यात नाशिकचा शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी आहे. शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग हे नाशिकमध्ये होत असून जगभरात नाशिकचा गौरव होत आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात अख्खं जग थांबलं होत. मात्र शेतकरी व त्याचे बांधव आपले काम नियमित करत होते. या अडचणीच्या काळातही शेतमाल उपलब्ध करून दिला. राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी पार पाडत असताना नागरिकांच्या घरात अन्न धान्य पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम केलं असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, कृषी क्षेत्रात खा.शरदचंद्र पवार यांनी अतिशय मोलाचे योगदान दिलं. त्यामुळे देश अन्नधान्य पिकविण्यात सक्षम झाला. त्यातून जगभरात अन्न धान्याची निर्यात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (Sharad Pawar made a very valuable contribution in the field of agriculture, so the country was able to grow food grains.) शेतकऱ्याचा शेतमालाला भाव नसल्यावर त्यावर अधिक चर्चा होत नाही मात्र भाव वाढले की अधिक चर्चा होते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, शासनाने अधिकचे कर्ज घेऊन गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा द्यावा असेही ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.