‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात म्हणजेच तुम्ही हिंदुत्व सोडलं’

मुंबई – मुंबईत काल पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhad thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह (Prime Minister Narendra Modi, Amit Shah) यांच्यासह भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर राज्यातील भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसाद लाड आणि मंत्री गिरीश महाजन (Prasad Lad And girish mahajan) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात म्हणजेच तुम्ही हिंदुत्व सोडलं, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

भाजप सेनेचा अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा फार्मूला ठरला होता असे मी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, असे दसरा मेळाव्यातील (Dasara Melava) जाहीर भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हेच निवडणुकीच्या वेळेस बोलले असते तर बरं झालं असतं. आता कितीही शपथा घेतल्या, बोलले तरी त्याचा उपयोग नाही या शब्दात गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात, दोन मतं कमी पडली म्हणून तुम्ही एम आय एम कडे गेलात. त्याचवेळी तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं, अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता भावनात्मक बोलायला नको तसेच स्फोटकही भाषण करायला नको. आता त्यांचं भाषण करून कुठलाही उपयोग नाही, कारण आता त्यांच्यासोबत कोणीच उरले नाही..लोक तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे महाजन म्हणाले.