४८ तास उलटूनही संदीपचे मारेकरी फरारच; पोलिसांना मारेकरीच नव्हे तर कारण देखील शोधता आले नाही ?

जालंधर- जालंधरमध्ये कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या हत्येप्रकरणी ४८ तास उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. नुकतीच आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप नांगल अंबिया याची कबड्डी स्पर्धेदरम्यान अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यात संदीपचा जागीच मृत्यू झाला.

संदीपच्या हत्येनंतर त्याच्या शाहकोटमधील घराबाहेर लोकांची गर्दी झाली होती. संदीपच्या हत्येनंतर जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते, मात्र प्रशासनाची समजूत काढल्यानंतर आता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संदीपच्या मृत्यूनंतर त्याच्या गावात शोककळा पसरली आहे. संदीपचे कोणाशीही वैर नव्हते, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे. कपूरथला येथील भुलथ येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा आणि दिवंगत माजी कॅबिनेट मंत्री अजित सिंह कोहर यांचे पुत्र आणि शाहकोटमधील शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार संदीप यांच्या घरी पोहोचले. संदीप यांच्या निधनाने झालेली उणीव कधीच भरून निघणार नाही, असे ते म्हणाले.

दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर जालंधर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. जालंधर पोलिसांनी सांगितले की, संदीपच्या एका साथीदारालाही गोळी लागली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. गोळी का चालवली याच्या उत्तरात एसएसपी सतींदर सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही हत्या का करण्यात आली हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र लवकरच मारेकऱ्यांना अटक करण्यात येईल. आज तक या वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.