‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, कशी आहे रामानुजाचार्यांची मूर्ती

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैद्राबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते हैद्राबादच्या पाटणचेरू इथल्या इक्रीसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेला भेट देतील आणि संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या सोहोळ्याचा आरंभ करतील. संध्याकाळी पंतप्रधान हैदराबादमधील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ म्हणजेच “समतेचा पुतळा” राष्ट्राला समर्पित करतील.

हा 216 फूट उंच समतेचा पुतळा 11 व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ उभारला आहे. श्री रामानुजाचार्य यानी विश्वास, जात आणि पंथ यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समानतेच्या संकल्पनेचा प्रचार केला. हा पुतळा ‘पंचधातुपासून’ म्हणजे सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पाच धातूंच्या मिश्रणानं तयार केला आहे. हा पुतळा बसलेल्या स्थितीत असून तो या श्रेणीतील जगातील सर्वात उंच धातूच्या पुतळ्यांपैकी एक आहे.

हा पुतळा ‘भद्रावेदी’ नावाच्या 54 फूट उंच इमारतीवर स्थापन केला आहे. यात वैदिक डिजिटल ग्रंथालय आणि संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय ग्रंथ, नाट्यगृह, श्री रामानुजाचार्यांच्या अनेक कार्यांचे तपशील देणारी शैक्षणिक दीर्घा यासाठी स्वतंत्र मजले आहेत. या पुतळा उभारणीची संकल्पना श्री रामानुजाचार्य आश्रमाचे श्री चिन्ना जीयार स्वामी यांची आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या सोहळ्याबाबतची माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या उद्घाटन सोहळ्याला मी जाणार आहे. ही श्री रामानुजाचार्य स्वामी यांना योग्य श्रद्धांजली असेल. त्यांचे विचार आणि शिकवण सदैव आपल्याला प्रेरणा देत असते, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भद्र वेदीत वैदिक डिजीटल पुस्तकालय आणि संसाधन केंद्र, प्राचीन भारतीय ग्रंथ, एक थिएटर आदीचं संचलन केलं जातं.