काय सांगता ? सुषमा अंधारे यांच्यासाठी चक्क शिवसेना उतरली मैदानात; महिला आयोगाकडे केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई  : बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी केला आहे. सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. मात्र सुषमा अंधारेंनी हा दावा फेटाळत आपल्याला कोणतीही मारहाण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र अप्पासाहेब जाधव यांनी आपण खरोखरच सुषमा अंधारेंना दोन चापट मारल्याचा दावा केला आहे.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना अप्पासाहेब जाधव म्हणाले, सुषमा अक्कांनी गेल्या १०-१२ दिवसांत खूप दादागिरी सुरू केलीय. त्या थेट ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बोलवून घेतात आणि त्यांच्याकडे २ लाखांची मागणी करतात. सर्वसामान्य शिवसैनिक एवढे पैसे नाहीत असे सांगून आम्ही ५० हजार देतो म्हणत रक्कम दिली. तर मी ५० हजार घेत असते का म्हणत अक्कांनी ते पैसे सरळ फेकून दिले. त्यांनी बऱ्याच कार्यकर्त्यांकडून सोफा घेतला, एसी बसवून घेतला. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटाची चांगलीच नाचक्की झाली असताना आता चक्क शिवसेना सुषमा अंधारे यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुषमा अंधारे यांची बाजू घेत कानपिचक्या दिल्या आहेत. सुषमाआक्का म्हणतायत,  मारहाण झाली नाही! जाधव म्हणतायत, आक्कांनी पैसे मागितले म्हणून दोन चापट्या मारल्या!  खरं तर एका महिलेवरील या मारहाण प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संपूर्ण चौकशी केली पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आणले पाहिजे!! अशी मागणी केल्याने शिवसेना सुषमा अंधारे यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.