आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघातामागे घातपाताची शक्यता?

Yogesh Kadam Accident: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे (शिंदे गट) नेते योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीचा काल रात्री (०६ जानेवारी) अपघात झाला. पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. टँकरने मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. पुढून मागून पोलिसांच्या गाडीचा घेरा असतानाही योगेश कदम यांच्यासोबत ही दुर्घटना घडल्याने हा अपघात घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर स्वत: योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. मागून आलेल्या टँकरने योगेश कदम यांच्या गाडीला मारलेली धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात टॅंकर पलटी झाला आहे. यानंतर टँकर चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.

या अपघातात योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली आहे, परंतु सुदैवाने ते सुखरुप आहे. त्यांच्या ड्राइव्हरला थोडी दुखापत झाली असून त्यांना चोळई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यानंतर अपघातसंदर्भात माध्यमांशी बोलताना योगेश कदम यांनी हा अपघात घातपात असल्याची शक्यता नाकारली नाही. अपघाताचा पॅटन साधारण अपघातासारखा नाही. माझ्या गाडीच्या मागेपुढे पोलिसांची गाडी असताना डप्परने धडक दिली. त्यामुळे शंका घेण्यास मोठा वाव असल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यांकडे अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी टीव्ही९ शी बोलतांना सांगितले.