जातीयवाद ते खोटारडेपणा;  ट्विट थ्रेडच्या माध्यमातून फडणवीसांनी केली शरद पवारांची पोलखोल 

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर सभेतील आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही गुरूवारी एकापाठोपाठ 14 ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून फडणवीसांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.

एका ट्विट थ्रेडच्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेलं भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत या सर्वांची बाबासाहेबांच्या विचाराशी सांगड घातलीय. एका ट्विटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फडणवीस म्हणाले,  आम्ही द काश्मीर फाईल्स या सिनेमाबाबत शरद पवार यांची विविध वक्तव्यं ऐकत आहोत आणि ती चकीत करणारी आहेत. राष्ट्रवादीचं तुष्टीकरणाचं धोरण आणि जातीच्या आधारावर ध्रुवीकरण या ट्रॅकशी ही भूमिका सुसंगत अशीच आहे. नवाब मलिक यांना जेव्हा अटक झाली त्यानंतर शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं. नवाब मलिक हे दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केल्याने आणि मनी लाँड्रींग केल्याने तुरुंगात आहेत मात्र जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा शरद पवार म्हणाले की नवाब मलिक मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांचा संबंध जोडला जातो आहे. हीच बाब पुढे नेत फडणवीस म्हणाले की दहशतवादी इशरत जहाँला निष्पाप आणि कॉलेजला जाणारी मुलगी असं म्हणणारे पवारच होते. यासाठी २०१३ च्या एका बातमीचा संदर्भही फडणवीस यांनी जोडला आहे.

इशरत जहाँ निर्दोष आहे एवढंच ते म्हणाले नाही तर सत्तेत असताना त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोलाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. २०१२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात होतं. त्यावेळी रझा अकादमीने जो मोर्चा काढला त्याला हिंसक वळण लागलं. अमर ज्योतीचीही विटंबना झाली. त्यावेळी गृहखात्याची जबाबदारी ज्या राष्ट्रवादीकडे होते त्यांनी रझा अकदामीवर कारवाई केली नाही, मुंबईचे पोलीस आयुक्त बदलले.

आपल्या राज्यघटनेत तरतूद नसतानाही मुस्लिम कोटा आणण्याची योजनाही तयार केली. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात काहीही केलं नाही. निवडणुकीत कुणाला विजयी करायचं आणि कुणाचा पराभव करायचा हे अल्पसंख्याक गट ठरवतो.

हिंदू दहशतवाद हा शब्द २००८ मध्ये सर्वात आधी वापरणारे शरद पवार होते, त्यांनंतर पी. चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे यांनीही हाच शब्द वापरला.  राजकीय पक्षांनी सुधारणांची अंमलबजावणी केली तर ती चांगलीच बाब आहे. मात्र राष्ट्रवादीचं म्हणणं होतं आधी सच्चर समिती लागू करा. १९९३ चे बॉम्बस्फोट ही मुंबईची भळभळती जखम आहे. १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली तेव्हा शरद पवारांनी मुस्लिम वस्तीत झालेल्या १३ व्या बॉम्बस्फोटाचा शोध लावला. मुख्यमंत्री असूनही ते खोटं बोलले.

जातीय सलोख्याची अपेक्षा असताना हा दुटप्पीपणा शरद पवारांनी का दाखवला? काश्मिरी पंडितांच्या भावना सिनेमात दाखवणारा चित्रपट कुणाला अस्वस्थ करतो? हे प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. काश्मीर फाईल्स हा सिनेमा कोणत्याही धर्माविरोधात नाही. तरीही शरद पवारांनी या सिनेमाचा विरोध दर्शवला. तुष्टीकरणाच्या राजकीय अजेंड्याला अनुकूल असं पाऊल त्यांनी उचललं. शरद पवारांच्या एकंदरीत भूमिका आणि विविध परिस्थितींमध्ये स्वीकारलेले मार्ग हे डॉ. आंबेडकरांच्या भारतात स्वीकारले जाऊ शकत नाहीत.