चंद्रकांत पाटील यांच्याकडून १७ हजार ५०० राष्ट्रध्वज वाटप

पुणे – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हर घर तिरंगाचा संकल्प केला असून, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून मतदारसंघात १७ हजार पाचशे राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’चा संकल्प केला आहे. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून; स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या जवानांना स्मरण करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या घरावर राष्ट्रध्वज लागला पाहिजे, यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आग्रही असून, त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास १७ हजार पाचशे राष्ट्रध्वजाचे वाटप केले आहे‌. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी आणि सोसायटीमध्ये जाऊन राष्ट्रध्वाजाचे वाटप केले. तसेच १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरी राष्ट्रध्वज लावण्याचा आग्रह धरला.

दरम्यान, हर घर तिरंगासाठी भाजपा कोथरूड मंडलाच्यावतीने उद्या दि. १४ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीत नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सहभागी होऊन सर्व कोथरूड करांना हर घर तिरंगासाठी आवाहन करणार आहेत.

दुपारी ४ वाजता. कोथरूड मतदारसंघातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ही रॅली सुरु होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कोथरूड मंडल भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.