भाजप अध्यक्षांनी तिरंगा फडकवण्यास काँग्रेस विरोध करीत असल्याचा आरोप सिद्ध करावा – कॉंग्रेस

पणजी – स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान सर्वांनाच माहीत आहे. तिरंगा आमच्या हृदयात आहे. देशभक्ती प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला सण वा उत्सवांची गरज नाही. भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काँग्रेस पक्षाने लोकांना तिरंगा फडकवू नका असे सांगितल्याचा त्यांचा आरोप सिद्ध करावा किंवा गोमंतकीयांची माफी मागावी, असे उघड आव्हान काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिले.

आज काँग्रेस भवनात युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक आणि एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या माध्यम प्रमुखानी भाजप अध्यक्षांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर तिरंगा फडकावण्यास आणि राष्ट्रगीत गाण्यास सांगण्याचे धाडस करण्याचेही आव्हान दिले.

भगवा बाजुला टाकून विविधतेतील एकतेचे प्रतीक असलेलातिरंगा अंगीकारण्यासाठी भाजपने संघाला सांगावे पटवून द्यावे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला. भाजपच्याच नेत्यांनी तिरंग्याचा अनादर करणाऱ्या अनेक भाजप नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे व्हिडिओ प्रसारित केल्याने भाजपची बेगडी देशभक्ती आता उघड झाली आहे. खुद्द भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी तिरंग्याला उलटा धरून राष्ट्रध्वजाचा अपमान केला. सरकारच्या तिरंगा यात्रेत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग आणि इतर राष्ट्रीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे सोडुन सवंग प्रसिद्धीसाठी नरेंद्र मोदी आणि प्रमोद सावंत यांचे फोटो लावणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

सदानंद तानावडे यांचा तिरंग्याचा अनादर करणारा व्हिडिओ आणि फोटो संपूर्ण गोव्याने पाहिला आहे. तिरंग्याचा योग्य सन्मान करण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीला इतरांना उपदेश करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी लगावला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य केल्याप्रमाणे अडीच लाख खराब झालेल्या तिरंगा ध्वजांवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पणजीमधील फूटपाथ अडवून कॅसिनोने उभारलेल्या बेकायदेशीर कमानीकडे सरकार डोळेझाक कशी करू शकते? असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.वरद म्हार्दोळकर यांनी केला. सरकारने युवक काँग्रेसला ती कमान काढून टाकण्यास भाग पाडू नये. पणजी नगरपालीकेने त्वरीत कारवाई करणे गरजेचे आहे असा इशारा त्यांनी दिला.

लोक उदरनिर्वाहासाठी धडपडत असताना भाजप सरकार आझादी का अमृत महोत्सवाच्या नावाखाली प्रचंड पैसा खर्च करत आहे हे खेदजनक आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा, गृह आधार आणि लाडली लक्ष्मी लाभार्थींना त्यांच्या अर्थसहाय्य वितरणासाठी महिनोनमहिने वाट पाहावी लागते, असे महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी सांगितले. ३ कोटी रुपयांची तूरदाळ व साखर नष्ट करणाऱ्या भाजप सरकारला आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा नैतीक अधिकार नाही असे त्या म्हणाल्या.

केवळ १८ मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यावर जवळपास ६ कोटी खर्च करणाऱ्या भाजप सरकारकडे विद्यार्थ्यांना मोफत तिरंग्याचे वाटप करण्यासाठी निधी नाही, ही धक्कादायक बाब आहे. शासन विद्यार्थ्यांना तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडत आहे. वायफळ खर्च व जाहिरातबाजी करण्यापेक्षा सरकारने गेल्या दहा वर्षांत खालावत चाललेल्या गोव्यातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, असे मत एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी व्यक्त केले.

तिरंगा उत्सवातुन सवंग प्रसिद्धी व माया कमावण्याच्या भाजपच्या डावपेचांना बळी न पडता, गोमंतकीयांनी देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मुक्तपणे साजरा करण्याचे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले. कॉंग्रेसच्यी चारही नेत्यांनी आझादी का अमृत महोत्सवमोहिमेचा प्रचार आणि कार्यक्रमांच्या आयोजनावर झालेल्या खर्चाचा तपशीलही भाजप सरकारने द्यावा अशी मागणी केली.

तूर डाळ नुकसान घोटाळा – माजी नागरी पुरवठा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा बडतर्फ करावे – काँग्रेस

तूर डाळ आणि साखरेची नासाडी केल्याप्रकरणी माजी नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केली. तूर डाळ आयात करून क्रोनी भांडवलदारांना पैसे कमविण्याच्या सोयीसाठी तूर डाळ जाणूनबुजून वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केला.