निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ?

ज्ञानेश्वर भामरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

दोंडाईचा :- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीत जातीत भांडण लावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. हा प्रयत्न आपण हाणून पाडत जातीय सलोखा कायम राखला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.ज्ञानेश्वर भामरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा भव्य मेळावा संपन्न झाला.जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी कामगार राज्यमंत्री डॉ.हेमंतरावजी देशमुख, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार अनिल गोटे, रामकृष्णतात्या पाटील,जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, इर्शाद जहागीरदार,किरण शिंदे,अर्जुन टिळे, किरण पाटील, रणजीतराजे भोसले, डॉ.मनोज महाजन, ज्योती पावरा, पोपटराव सोनवणे,राजेश बागुल ललित वारुडे,बापु महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, दोंडाईचा परिसरात तसा शेतीप्रधान असलेला परिसर मात्र येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष गेल्याचे चित्र आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेली सर्वात मोठी बाजार पेठ आज फक्त नावाला उरली असून या बाजार पेठेचा उपयोग शेतकरी हितासाठी नव्हे तर केवळ राजकरणासाठी वापर होत असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत घोषित करण्यात आली प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फक्त ८ हजार ५०० रुपये मंजुर केले.अद्याप हजारो शेतकरी मदतीपासून वंचित असून सरकार आपल्या निर्णयावर घूमजाव करत आहे. शेतकय्रांना खते मिळत नाही तर दुसरीकडे कृषी मंत्र्याचा पीए धाडी टाकतो आणि लक्ष्मी दर्शनाची मागणी केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, दोंडाईचा परिसरात अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थांची निर्मिती झाली. मात्र त्या अनेक बँका बुडल्या. या परिसरात नरडाणा सारखी मोठी औद्योगिक वसाहत असतांना देखील येथील तरुणांचे रोजगाराचे प्रश्न सुटलेले नाहीत. अनेक उद्योग बंद पडल्याने तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. नोट बंदीचा देखील मोठा फटका बसला अनेक उद्योग उध्वस्त झाले. आता पुन्हा दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. केवळ जनतेला बँकेच्या रांगेत उभं केलं जातंय असे सांगत जर बंदच करायच्या होत्या तर दिल्याचं कशाला अशी सडकावून टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, पर्यटन वाढविण्यासाठी नाशिकच्या बोटी येथे आणल्या गेल्या.बोटिंचेच पर्यटन केले गेले.यांच्याकडे सत्ता असतानाही हे का नवीन बोटी आणू शकले नाही असा सवाल उपस्थित करत पर्यटनासाठी खर्च केला गेला मात्र पर्यटन वाढीसाठी काहीही फायदा झालेला दिसत नाही असे त्यांनी सांगितले. तसेच येथील शेतीचा बाजार तेजीत नाही, पण घोडे बाजार तेजीत आहे असे म्हणावे लागेल असा समाचार त्यांनी घेतला.

ते म्हणाले सद्या जाती – जातीत भांडण लावण्याचे काम सुरू असून दोन समाजात वितुष्ट आणण्याचे काम केले जात आहे. दंगली घडविल्या जात आहेत. मात्र आपण जागरूक राहील पाहिजे. एकजूट ठेवली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, राज्यात इतिहासाची मोड तोड सुरू आहे. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मोड तोड करून मांडला आता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. बदनामी केली जात आहे. या विरुद्ध आपल्याला एकजूट होऊन आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसात वर्तमान पत्रात दोन जाहिराती छापल्या गेल्या. परंतु ज्यांच्या नावावर सरकार स्थापन केलं त्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा विसर त्यांना पडलेला दिसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाहिरात छापली गेली त्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांचे फोटो छापले गेले. भाजपचे मंत्री मात्र दिसले नाही. तसेच जाहिरातीवर एवढा खर्च कुठून केला गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.