नव्या वर्षात कोरोनाचे अरिष्ट जाऊन महागाईतून जनतेची सुटका होवो : नाना पटोले

मुंबई – सरत्या वर्ष २०२१ हे देशातील अन्नदात्यासाठी अत्यंत कष्टदायी व दुःखद असे ठरले. काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले असले तरी त्यासाठी शेतक-याला मोठा संघर्ष व त्याग करावा लागला. या संघर्षात ७०० शेतकरी बांधवांचा बळी गेला. अतिवृष्टी व अवकाळीने बळीराजाचे अतोनात नुकसान केले. सरत्या वर्षातील हे कठीण प्रसंग सरत्या वर्षाबरोबर संपू दे व बळीराजाला नवीन वर्षात भरभराट येवो, त्याला सुगीचे दिवस येवो, अशी प्रार्थना करून त्यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

पटोले पुढे म्हणाले की, शेतक-यांबरोबरच सामान्य जनता पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाच्या किमती गगणाला भिडल्याने मेटाकुटीस आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे महागाईचे संकट या दुष्टचक्रात जनता होरपळून निघाली आहे. नवीन वर्षात तरी महागाई कमी होऊन जनतेला दिलासा मिळावा. तरुण वर्गांसमोर असलेले  बरोजगारीचे संकट दूर होऊन रोजगाराच्या संधी वाढाव्यात.

कोरोनाच्या संकटावर मागील वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश आले परंतु ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुन्हा संकट उभे ठाकले आहे. सरकारने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करू व ओमायक्रॉनच्या संकटावरही मात करु आणि अस्मानी, सुलतानी संकटातून जनतेची सुटका व्हावी अशी प्रार्थना करू. नवीन वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धी व आरोग्यदायी ठरो, अशा शुभेच्छा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दिल्या आहेत.